भुसावळ ( प्रतिनिधी ) : भुसावळ शहरातील वाढती गुन्हेगारी आणि शांततेला आव्हान देणाऱ्या समाजकंटकां विरोधात पोलिसांनी आता आरपारची लढाई जाहीर केली आहे. शहरातून हद्दपार करण्यात आलेले गुन्हेगार पुन्हा शहरात आढळल्यास कोणतीही दयामाया न दाखवता थेट कोठडीत टाकण्याचे स्पष्ट आदेश डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिले आहेत. सराईत गुन्हेगार टोळ्यांविरोधात मोक्का व हद्दपारीचे नवे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
भुसावळ उपविभागातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या विशेष बैठकीत डीवायएसपी बारबोले यांनी शहरातील गुन्हेगारीचा आलेख, प्रलंबित तपास आणि नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा आराखडा स्पष्ट केला. “गुन्हेगारांना शहरात कोणतीही जागा नाही,” असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला. बैठकीला शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे राहुल वाघ, तालुका पोलिस ठाण्याचे महेश गायकवाड तसेच वाहतूक शाखेचे एपीआय उमेश महाले उपस्थित होते.
पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळावली आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ठरावीक भागांतील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले जाणार आहे.संवेदनशील भागात कोंबिंग ऑपरेशन आगामी काळात शहरातील संवेदनशील भागांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवले जाणार असून नाकाबंदी अधिक कडक केली जाईल. सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. हद्दपारीचे आदेश मोडून शहरात येणाऱ्यांवर बीएनएस कलम ३२९ अन्वये थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
















