यवतमाळ (वृत्तसंस्था) प्लॉटच्या फेरफारसाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या यवतमाळ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकास लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने बुधवार दि. २६ एप्रिल रोजी दुपारी केली. या कारवाईनंतर त्रस्त झालेल्या नागरिकांनी परिसरात पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
विजय राठोड असे लाच घेणाऱ्या भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाचे नाव त्यांच्याकडे तक्रारदार यांनी अर्ज करुन आपल्या जावयांचे नाव प्लॉटच्या मिळकत पत्रिकेमध्ये समाविष्ट करून फेरफार घेण्याची मागणी केली होती. हे काम करण्यासाठी विजय राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावरून तक्रारदार यांनी १८ एप्रिल रोजी अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये विजय राठोड यांनी लाच मागण्याचे व स्वीकारण्याचे पंचासमक्ष कबुल केले. त्यावरून या पथकाने २६ एप्रिल रोजी सकाळी भुमी अभिलेख कार्यालय परिसरात सापळा रचला. त्यात विजय राठोड यांनी त्यांच्या कॅबीनमध्ये तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच स्विकारली. यावेळी दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने लगेच कारवाई करुन विजय राठोड यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना शासकीय विश्रामगृह येथे नेत त्यांची चौकशी करण्यात आली.
अमरावती एसीबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. ही कारवाई एसीबी पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत, पोलिस उपअधीक्षक अमरावती एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल कड्डू, योगेश कुमार दंदे, कर्मचारी युवराज राठोड, शैलेश कडु, आशिष जांभोळे, सतिश किटुकले या अमरावती एसीबीच्या पथकाने पार पाडली. दरम्यान, या कारवाईनंतर नागरिकांनी परिसरात पेढे वाटून आनंद व्यक्त केल्यामुळे लोकं किती त्रस्त होते, हे यावरून लक्षात येते.