चंदिगड : पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगची त्याच्या आश्रमाचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंगच्या हत्येच्या आरोपातून मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. २२ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणातून राम रहीमची सुटका झाली असली तरी पत्रकार हत्याकांड आणि दोन महिला शिष्यांवरील बलात्कार प्रकरणी तो सध्या २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.
हरयाणाच्या पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयाने ऑक्टोबर २०२१ मध्ये निर्णय देताना रणजीत सिंगच्या हत्येप्रकरणी राम रहीमसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. रणजीत सिंगची कुरुक्षेत्राच्या खानपूर कोलिया गावात १० जुलै २००२ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रणजीत हा सिरसा येथील डेरा मुख्यालयात व्यवस्थापक होता. या डेऱ्यात राम रहीम महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे एक निनावी पत्र पंजाब प्रशसनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले होते. यानंतर राम रहीमचे अनेक अनुयायी दुरावले होते. रणजीत देखील व्यवस्थापक पदाचा राजीनामा देऊन कुटुंबासह डेऱ्यातून निघून गेला होता. हे पत्र रणजीतनेच त्याच्या बहिणीच्या माध्यमातून पाठवल्याचा राम रहीमला संशय होता. यानंतर एके दिवशी अचानक रणजीतची हत्या करण्यात आली.
या हत्येमागे राम रहीम आणि त्याचे काही समर्थक असल्याचा सीबीआयचा आरोप होता. सीबीआयने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर विशेष न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, राम रहीमला आपल्या दोन शिष्यांवरील बलात्कार प्रकरणी २०१७ साली २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तसेच १६ वर्षांपूर्वीच्या एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी देखील २०१९ मध्ये तो दोषी ठरला आहे. राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात कैद आहे.