धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील महात्मा गांधी उद्यानात रातोरात डेरेदार वृक्षांची कत्तल करत जेसीबीच्या सहाय्याने पुरावे नष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजप कायदेशीर गुन्हा दाखल करणार असून या कामावर स्टे आणण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याची माहिती भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड संजय महाजन,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,ललित येवले,शरद अण्णा धनगर, शोभा राजपूत, संगीता मराठे,भालचंद्र जाधव यांनी दिली आहे.
याबाबत भाजपने २४ मे रोजी हरकत घेत वृक्षांची कत्तल करण्यात येऊ नये, अशी हरकत घेतली होती. त्यावर धरणगाव मुख्याधिकारी यांनी ९ मे रोजी दिलेल्या पत्रात असे म्हटले होते की, वृक्ष तोडल्याशिवाय उद्यान विकसित होणे शक्य नाही. तसेच वृक्ष प्राधिकरण अध्यक्षांच्या मौखिक सूचनेनुसार आपला तक्रार अर्ज निकाली काढत आहोत, असे सांगितले. पालिकेकडे कोणत्याही प्रकारे वृक्ष प्राधिकरणाचे लेखी आदेश नसतांना सुट्टीच्या दिवशी म.गांधी उद्यान मधील झाडांची कत्तल रातोरात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पुरावे नष्ट व्हावे म्हणून जेसीबीच्या साहाय्याने मुळासकट झाडे उपटण्यात आली. आणि सदरील जागा जेसीबी व ट्रॅक्टरच्या मदतीने सपाटीकरण केले आहे. सुटीच्या दिवशीच रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे कारण काय?तोडलेली साग,निलगिरी,निबांची झाडे गेली कुठे?, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. सदरील विषयाची संपूर्ण माहिती घेऊन भारतीय जनता पार्टीच्यावतीने कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येईल. तसेच या कामाविषयी कोर्टातून स्टे ऑर्डर मागितली जाईल, अशी माहिती भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड संजय महाजन, शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,ललित येवले,शरद अण्णा धनगर, शोभा राजपूत, संगीता मराठे,भालचंद्र जाधव यांनी दिली आहे.