
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगावचा एकदंत महोत्सव म्हणजे केवळ सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन आणि उत्सव नाही, तर समाजातील सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा, त्यांच्या आयुष्यात सुखाचे काही क्षण आणण्याचा आणि माणुसकीची नाती जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
आज गणेश विसर्जनाच्या दिवशी महोत्सवाच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या १०० बक्षिसांच्या भव्य लकी ड्रॉमध्ये तब्बल ११ हजारांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. इलेक्ट्रिक स्कुटी, मिक्सर, एलईडी टीव्ही, फॅन, गॅस शेगडी, कुकर, घड्याळे, कप सेट, पर्स अशा विविध बक्षिसांनी महिलांच्या आनंदात भर घातली.
बारकोड टोकन, डिजिटल स्कॅनिंग आणि स्क्रीनवर थेट विजेत्यांची नावे जाहीर करण्याच्या पारदर्शक पद्धतीने हा लकी ड्रॉ पार पडला. लहान मुलांच्या हातून निवडल्या जाणाऱ्या चिठ्ठ्या आणि प्रत्येक बक्षिसाच्या घोषणेनंतर महिलांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहताना मन अक्षरशः भरून येत होते.
पण आजचा दिवस माझ्यासाठी आणि सौ.प्रतिभा सह आम्हा सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहील, असा एक भावनिक क्षण घेऊन आला.
आजच्या लकी ड्रॉमधील प्रथम क्रमांकाची इलेक्ट्रिक स्कुटी जिंकल्या त्या देवळी येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या सौ. देवकाबाई अर्जुन सोनवणे या भगिनीने!
हातावर पोट असणाऱ्या, दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या देवकाबाईंची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. बक्षीस स्वीकारण्यासाठी त्या माझ्यासमोर आल्या, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधताना सहज विचारले, “ताई, तुमचं घरदार कसं आहे?”
त्यावर त्यांनी सांगितले की, “दादा, आम्हाला स्वतःचं घरसुद्धा नाही!”
हे ऐकताच मन गहिवरून आले. ज्या भगिनीने आयुष्यभर कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा ओढला, तिच्या डोक्यावर हक्काचं छप्परही नाही आणि आज तिच्या पदरात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एवढं मोठं बक्षीस पडलं होतं!
त्याक्षणी माझ्या तोंडून एकच भावना व्यक्त झाली…
“देवकाबाई, आज खऱ्या अर्थाने तुम्हाला गणपती बाप्पा पावला!”
मान्यवरांच्या हस्ते देवकाबाईंना इलेक्ट्रिक स्कुटी प्रदान करण्यात आली. बक्षीस स्वीकारताना त्यांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू, दाटून आलेला कंठ आणि चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून मन भरून आले.
त्या अश्रूंमध्ये त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांची कहाणी होती, संघर्ष होता आणि अचानक मिळालेल्या आनंदाचा अविश्वसनीय अनुभवही होता.
देवकाबाईंच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण आमच्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे!
मित्रांनो, चाळीसगावचा एकदंत महोत्सव सुरू करण्यामागे आमची एकच भावना होती. आपल्या परिसरातील शेवटच्या घटकापर्यंत सांस्कृतिक चळवळ पोहोचली पाहिजे. रोजच्या धावपळीत, कष्टात आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेल्या प्रत्येक माता-भगिनीने स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी वेळ काढावा, या महोत्सवात सहभागी व्हावे आणि आनंदाचे चार क्षण अनुभवावेत.
म्हणूनच या महोत्सवात केवळ महिलांसाठी खास लकी ड्रॉ आयोजित केला जातो.
यापूर्वीही भाजीपाला विकणाऱ्या आजीला, झोपडपट्टीत राहणाऱ्या भगिनीला आणि अशाच अनेक कष्टकरी, गरजू महिलांना गणपती बाप्पाच्या कृपेने मोठी बक्षिसे मिळाली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि डोळ्यांतील समाधान हीच आमच्या या उपक्रमाची खरी कमाई आहे.
कारण बक्षीस कोणाला मिळेल, हे नशिबावर अवलंबून असते; पण एकत्र येऊन आनंद साजरा करणे, एकमेकींच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला आपलेपणाची जाणीव करून देणे, हे आपल्या हातात असते. देवकाबाईंच्या आयुष्यात आज आनंदाचा एक नवा अध्याय सुरू झाला, यापेक्षा मोठे समाधान ते काय असू शकते?
गणपती बाप्पा, देवकाबाई आणि चाळीसगाव तालुक्यातील माझ्या सर्व माता भगिनी व त्यांच्या कुटुंबाला सुख, समाधान आणि समृद्धी लाभू दे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष दूर होवोत हीच तुझ्या चरणी मनापासून प्रार्थना!
आजच्या या अविस्मरणीय क्षणाने चाळीसगावचा एकदंत महोत्सव अधिकच भावनिक आणि संस्मरणीय झाला.
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!














