धरणगाव (प्रतिनिधी) अमळनेरच्या तरुणावर चाकू हल्ला करणारा मुख्य आरोपी महेंद्र बोरसे अद्याप फरार असून या प्रकरणात महेंद्र याचा लहान भाऊ विनोद बोरसे (पोलिस पाटील, सात्री) याच्यावरही पोलिस तपासात आरोप निष्पन्न झाला. दरम्यान, विनोद बोरसे हा गावाचा पोलीस पाटील असून गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे दोघांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सुरेश पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे सुरेश पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, गोपाल उर्फ उमाकांत पाटील (रा. सुंदरपट्टी, ता. अमळेनर) हा तरुण जळगाव येथून न्यायालयीन कोठडीतून जामीनावर सुटका होऊन अमळनेरकडे मोटारसायकीलवरुन येत होता. त्यावेळी सागर खैरनार, विजय देवरे आणि आकाश उर्फ राघव जाधव या तिघांनी गोपालवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला केला. गोपाल गंभीर जखमी झाला होता. तो धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल असून अद्यापही त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी धरणगाव पोलिसांत महेंद्र बोरसे व अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या तपासात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतर्फे सागर खैरनार, विजय देवरे आणि आकाश उर्फ राघव जाधव या तिघांना अटक केली. पोलिसांनी अधिक तपास केला असता महेंद्र बोरसे याचा लहान भाऊ विनोद बोरसे हा देखील त्या चाकू हल्ल्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आणि विनोद बोरसे याच्यावरही धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र दोघेही फरार असून पोलिस दोन्ही भावांच्या मागावर आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहेत.
दरम्यान, विनोद बोरसे हा सात्री गावाचा पोलिस पाटील असून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्याच्या हाती आहे. मात्र, शासनाचा महत्त्वाचा समजला जाणारा दुवा असूनही त्याने या गुन्ह्यात हस्तक्षेप करुन एकप्रकारे त्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बोरी नदीला पुर आल्यास सात्री गावाचा संपर्क तालुक्याशी तुटतो. अशा वेळेस गावात कायदा व सुव्यवस्थेसह मोठी समस्या निर्माण होऊ शकते, त्यामुळे दोघांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी, मागणी देखील सुरेश पाटील यांनी केली आहे.
याबाबत धरणगाव पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संशयित आरोपींच्या शोधासाठी एक पथक काम करीत आहेत. तांत्रिक मदतीने आरोपींचा शोध सुरु आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असेही पो.नि. देसले यांनी सांगीतले.