धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीतील ८ जणांना धरणगावच्या दोन गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर अमळनेर पोलिसांनी सर्वांना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातच ताब्यात घेतले होते. परंतू अमळनेरच्या गुन्ह्यातही सर्वांचा जामीन झाला आहे.
गुरुवारी (१९ मे) मध्यरात्री चोरट्यांनी चक्क एका पोलीस अधिकाऱ्याची दुचाकी लांबवल्या प्रकरणी पोलिसांनी काही संशयिताना पकडले. त्यात १) यश दिनेश सातपुते २) तुषार बत्तीसे ३) वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी ४) मनीष ऊर्फ भुर्या योगेश चौधरी ५) सय्यद पीरण सय्यद मुख्तार यांचा समावेश होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच धुळे येथे मोटार सायकल विकल्याचे समोर आले होते. त्यानुसार ६) वैभव उर्फ दादू सुरेश मोरे ७) हसन उर्फ अली मोहम्मद शेख ८) वसीम शेख बिस्मिल्ला यांच्या नावे समोर आली होती. धरणगाव पोलीसांनी त्यांना देखील अटक केली होती. सर्व संशयिताना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्या नंतर न्यायालयात हजर केले असता सर्वांची पहिल्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झाली. परंतू धरणगाव पोलिसांनी लागलीच दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्यातही लागलीच जामीन झाला. परंतू अमळनेर पोलिसांनी संत सखाराम महाराज यात्रेतून चोरीला गेलेल्या एका मोटार सायकलच्या गुन्ह्यात या टोळीला ताब्यात घेतले होते. त्या गुन्ह्यातही चोपडा कोर्टात सर्वांचा जामीन झाला आहे. संशयित आरोपींकडून अॅड. संजय शुक्ला, अॅड. शरद माळी, अॅड. मनोज दवे, अॅड. असिफ कादरी यांनी कामकाज बघितले.