धरणगाव (प्रतिनिधी) येथील सुनील मधुकर चौधरी व अनिता चौधरी या दाम्पत्यांकडून ३५ लाख रुपये घेऊन सौदा पावती केलेल्या प्लॉटची दुसऱ्यालाच विक्री केल्याप्रकरणी तीन जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू एका आरोपीला अटकपूर्व मंजूर असल्याचे धरणगाव न्यायालयात खोटे सांगून दिशाभूल केल्याचा धक्कादायक आरोप चौधरी दाम्पत्यांनी केला आहे. चौधरी दाम्पत्यांने पोलीस अधीक्षकांकडे संबंधित पोलीस अधिकारी आणि आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुनील व अनिता या दाम्पत्याचा प्लॉट खरेदी, विक्रीचा व्यवसाय आहे. विजय छंदलाल गाडीलोहार (रा. कल्याण) याने धरणगाव येथील प्रतिभा भालचंद्र बागुल व मयुर भालचंद्र बागुल यांच्याशी त्यांच्या मालकीचे शेत गट क्र.५३८/१/१ धरणगाव शिवारातील शेत मिळकतीचा सौदा २३ डिसेंबर २०१५ रोजी केला होता. त्यापोटी लोहार व बागुल यांनी ११ जानेवारी २०१६ ते ११ जानेवारी २०१७ या कालावधीत ३५ लाख रुपये घेऊन सौदापावती व नोटरी करुन दिली. एन.ए. झाल्यावर प्लॉट खरेदी करुन देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली, मात्र जेव्हा प्लॉट एन.ए. झाला तेव्हा तिघांनी तिसऱ्याच व्यक्तींना यातील काही प्लॉट खरेदी करून दिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रतिभा बागुल, मयुर बागुल व विजय गाडीलोहार या तिघांविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही त्याला जामीन मंजूर असल्याचे खोटे सांगून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप सुनील चौधरी यांनी केला आहे.
लोहार याच्याविरुद्ध कारवाई व्हावी, चौधरी दाम्पत्यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय लोहार याने जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. चौधरी यांनी त्यास हरकत घेतली असता लोहार याने ३५ लाख रुपये घेतल्याचे मान्य करुन ३१ मार्च २०१९ पर्यंत प्लॉट खरेदी करुन देण्याच्या अटीशर्तीवर न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान, यानंतर लोहार याने रहिवासाचे ठिकाण बदल केले. त्यामुळे न्यायालयाच्या नोटीसा त्याला मिळू शकल्या नाहीत. स्थानिक पोलिसांना तसा अहवाल न्यायालयाला सादर केल्यानंतर त्याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला. दरम्यानच्या काळात तपासाधिकारी हनुमंत गायकवाड यांनी लोहार याला वगळून इतर दोघांविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करायचा प्रयत्न करुन लोहार याला अटकपूर्व मंजूर असल्याचे धरणगाव न्यायालयात खोटे सांगून दिशाभूल केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पोलीस संशयितांना मदत करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर न्यायालयाने त्यात त्रुटी काढल्या व दोषारोपपत्र दाखल करुन घेण्यास नकार दिला. दरम्यान, याप्रकरणात हनुमंत गायकवाड यांचीही चौकशी व्हावी व लोहार याच्याविरुद्ध कारवाई व्हावी अशी मागणी तक्रारदार चौधरी दाम्पत्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.