धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीला आज पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तर उर्वरित तिघां आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, ‘मास्टर माइंड’ गौतमला ताब्यात घेण्यासाठी आज गुजरात पोलिसांचे दोन पथकं सकाळपासूनच धरणगाव न्यायालयात पोहोचल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.
धरणगावात बनावट मद्य निर्मिती करतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून १) गौतम नरेंद्र माळी, वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव २) भुपेंद्र गोकुळ पाटील, वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव ३) कडु राजाराम मराठे, वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव ४) भास्कर पांडुरंग मराठे, वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव, अशा चार जणांना रंगेहाथ अटक केली होती. दुसऱ्या दिवशी भूपेंद्र पाटीलने दिलेल्या माहितीवरून सचिन पाटील (रा. पाळधी ता. धरणगाव) याला पाळधी येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सचिन पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. तर तत्पूर्वी भूपेंद्रसह चौघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती.
‘मास्टर माइंड’ला ताब्यात घेण्यासाठी गुजरात पोलिसांचे दोन पथकं धरणगावात
या चौघं आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज धरणगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. दुसरीकडे गुजरात पोलिसांचे दोन पथक धरणगाव न्यायालयाच्या आवारात सकाळपासूनच थांबून होते. भरूच आणि नटवर पोलीस स्थानक या दोन ठिकाणच्या पोलिसांचे पथक आलेले होते. यामुळे बनावट मद्याचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहचले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘मास्टर माइंड’विरुद्ध गुजरातमध्ये बनावट मद्य तस्करीचे तीन गुन्हे !
गुजरात पोलिसांच्या दोघं पथकाने गौतम नरेंद्र माळी यांच्यावर भरूच पोलीस स्थानकात ३ तर नर्मदा पोलीस स्थानकात अनुक्रमे एक गुन्हा असल्याचे कळते. तसेच या आरोपीला आपल्याकडे हस्तांतरीत करण्यात यावे, यासाठी अर्ज केला. परंतू गौतम माळीला पुन्हा तीन दिवसांची अर्थात २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यामुळे गुजरात पोलिसांना आरोपीचा ताबा घेता आला नाही. इतर तिघं संशयित आरोपींची १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणात आता धुळ्याचा सहावां अद्यापही आरोपी फरार आहे.