धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका भागात आठ आणि पाच वर्ष अशा दोन बालिकांसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ६२ वर्षाच्या वृद्धाविरुद्ध धरणगाव पोलिसांनी अवघ्या १२ व्या दिवशी साधारण २०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.
नेमकी काय होती घटना ?
धरणगावातील एका परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची पीठाची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. दळण दळून त्यांची आई घरी निघून गेली. उशीर झाला तरी मुली घरी न आल्यामुळे आई त्यांना घेण्यासाठी परत आली. त्यावेळी चंदुलाल मराठे याने दोन्ही मुलींना आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी आणले. गरीब कुटुंबातील आई हा प्रकार पाहून हादरून गेली होती. दरम्यान, सहा वर्षाच्या बालिकेने चक्कीवाल्या बाबाने आपल्यालाही मांडीवर बसवले असे सांगताच आई हादरली. कामावर गेलेला नवरा घरी परतताच तिने सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोषारोप पत्रात सबळ पुराव्यांसह वैद्यकीय अहवाल
गुन्ह्याची संवेदनशीलता लक्षात घेता धरणगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध अवघ्या १२ व्या दिवशी साधारण २०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. दोषारोप पत्रात सबळ पुराव्यांसह वैद्यकीय अहवाल आणि २१ साक्षीदारांपैकी १० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश अहिरे यांनी गुन्ह्याचा तपास केला. याकामी पोहेकॉ संदीप पाटील, एएसआय मंगला पाटील, हवलदार ज्योती चव्हाण, पो.ना.हर्षली खैरनार, पो.ना. उमेश पाटील यांचे सहकार्य लाभले.
खटल्याचं कामकाज फास्टट्रॅक कोर्टात चालणार
गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी चोपडा भास्कर डेरे यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. त्यानुसार या खटल्याचं कामकाज फास्टट्रॅक कोर्टात चालावे म्हणून श्री. डेरे यांनी न्यायालयास पत्र दिले. त्यामुळे आता खटल्याचं कामकाज फास्टट्रॅक कोर्टात चालणार आहे. या खटल्याचे कामकाज प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. केतन ढाके हे बघणार आहे.