धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबवल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली. दरम्यान, चोरटे दोन नव्हे तर, तीन असून जळगावच्या दिशेने जातांना सीसीटीव्हीत तिघं संशयित कैद झाल्याची माहिती सामोर येत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात अनिल कुमार अँड हेमराज कंपनी नावाने किराणा दुकानासह होलसेलचे व्यापारी गुंजन डेडीया यांचे दुकान आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गुंजन डेडिया हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले होते. गुंजन डेडिया यांनी दुकानाचे बाजूचे शटर उघडून पैशांची पिशवी दुकानात ठेवली आणि समोरील शटर उघडण्यासाठी गेले. याच काळात दोन अज्ञात भामट्यांनी दुकानात घुसून रोकड असलेली पिशवी घेऊन दुचाकीवरून पळ काढला.
घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद झाले. परंतू तपासचक्र फिरवल्यानंतर चोरटे दोन नव्हे तर, तीन असून जळगावच्या दिशेने जातांना सीसीटीव्हीत तिघं संशयित कैद झाल्याची धक्कादायक माहिती सामोर येत आहे. तसेच दोघे चोरटे सकाळी साडेआठ वाजेपासूनच डेडीया यांच्यावर पाळत ठेवून असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक चोरट्यांच्या तपासात वेगवेगळ्या भागात गेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिलीय.
धरणगाव सारख्या छोट्याशा शहरात भर दिवसा एवढी मोठी चोरी झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भामट्यांना परिचित मधीलच कुणीतरी टीप दिली असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. कारण अगदी नियोजित पद्धतीने चोरी झाली आहे. चोरीच्या ठिकाणी दोन जण दुचाकीवरून पळ काढतांना दिसताय. मात्र, धरणगाव बाहेरील एका जिनिंगच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र दुचाकीवर दोन नव्हे तर, तीन जण दिसत आहेत. त्यामुळे दोन जण चोरणारे तर तिसरा माहिती (टीप) देणारा असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.