धरणगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी उपक्रम १०० दिवसांच्या कार्यालयीन विशेष सुधारणा मोहिमेत धरणगाव नगरपरिषदेने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार गतिमान प्रशासनासाठी १०० दिवसांची कार्यालयीन विशेष सुधारणा मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांचा सहभाग होता. या मोहिमेत संकेतस्थळ अद्यावतीकरण, सुकर जीवनमान, कार्यालयीन सोयीसुविधा, कार्यालयीन स्वच्छता, तक्रार निवारण, औद्योगिक व व्यापारास चालना, ई- ऑफिस प्रणाली, क्षेत्र भेटी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविणे, तंत्रज्ञानाचा वापर तसेच नाविण्यपूर्ण उपक्रम यासारख्या बाबी समाविष्ट होत्या. या कालावधीमध्ये प्रत्येक कार्यालयाने केलेल्या कामगिरी नुसार गुणांकन करण्यात आले.
धरणगाव नगरपरिषदेने पालकमंत्री मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या नेतृत्वाखाली मागील चार महिन्यांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली. यामधील उल्लेखनीय बाबी म्हणजे पाणीपुरवठ्यात सुधारणा व घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होय. पाणीपुरवठा योजना पूर्ण करून नागरिकांना २०-२५ दिवसांऐवजी ५-६ दिवसांनी शुद्ध पाणीपुरवठा नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनामध्ये नगर परिषदेने CSR मार्फत निधी उपलब्ध करून घरोघरी 16000 डस्टबिन वाटप केल्या. नगरपरिषदेने डस्टबिन वाटप करण्याबरोबरच घरोघरी दररोज घंटागाडी जाईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यामुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळून कचरा कुठेही पडणे कमी झाले. याबरोबरच नगर परिषदेने इतर महत्त्वपूर्ण उपक्रम देखील राबविले. कर मुक्त बचत गट हे अभियान राबवून यावर्षी विक्रमी 4.44 कोटीची वसुली केली. प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटवून अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली.
पथदिव्यांना ऑटोमॅटिक यंत्रणा बसविण्यात आली. मुख्य रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण करण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, नगरपरिषद कार्यालय, घनकचरा प्रक्रिया केंद्र इत्यादी ठिकाणी तसेच परिसरात स्वच्छता करून सौंदर्यीकरणात वाढ केली. तेली तलावाच्या ठिकाणी महास्वच्छता अभियान राबवून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता केली. RRR केंद्र व बर्तन बँक यासारखे अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले. सेवानिवृत्त नगरपरिषद कर्मचाऱ्यांना थकीत रकमेपैकी 68 लाख रुपये एकरकमी प्रदान करण्यात आले. याचबरोबर नागरिकांच्या तक्रारी वेळच्यावेळी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर नगरपरिषदेचे संकेतस्थळ अद्यावत करणे, कर्मचारी व अभ्यागतांसाठी कार्यालयीन सोयीसुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहाची व्यवस्था, भेटीची वेळ निश्चित करणे व कार्यालयाचे सौंदर्यीकरण करणे यासारख्या अनेक गोष्टी करण्यात आल्या.
वरील कामगिरीच्या आधारे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या समोर केलेल्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येऊन धरणगाव नगरपरिषदेची विभागास्तरावर शिफारस करण्यात आली. विभाग स्तरावर नाशिक विभागात सुध्दा कामगिरीच्या आधारावर धरणगाव नगरपरिषद कार्यालय प्रथम क्रमांकावर राहिले. यामध्ये शहरातील सर्व नागरिक, पदाधिकारी , व्यापारी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचे योगदान आहे तसेच यापुढे देखील नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले.