धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलमध्ये धरणगाव तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल झोपे, प्रा. जगन्नाथ दरिंदले, प्रतापराव पाटील, डॉ. भावना भोसले, डॉ. राजेंद्र सैदाणे, सी. के. पाटील, एस. एस. पाटील, मुख्याध्यापक डी. एस. पाटील सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत आणि विज्ञानगीताने झाली. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. डॉ. भावना भोसले यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करा असे प्रेरणादायी संदेश दिला.
प्रदर्शनात ४५ माध्यमिक, १५ प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी उपक्रम सादर केले; ६ शिक्षकांच्या शैक्षणिक साधने आणि ३ प्रयोगशाळा परिचरांच्या उपकरणांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
विज्ञान समन्वयक एन. आर. सपकाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. अनिल झोपे, प्रा. दरिंदले, प्रतापराव पाटील, डॉ. मिलिंद डहाळे यांनी विद्यार्थ्यांना संधी परिश्रमातूनच मिळते असे प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.
भावनिक क्षण : प्रतापराव पाटील यांची “ही शाळा माझीच” म्हणत भोजनव्यवस्थेची तत्परता
कार्यक्रमादरम्यान वेळेअभावी भोजनाची व्यवस्था राहिल्याचे लक्षात येताच माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि इतरांसाठी तात्काळ भोजनाची व्यवस्था केली. या वेळी आपल्या मनोगतात त्यांनी अत्यंत आपुलकीने सांगितले :
“ही शाळा माझीच आहे… शाळेने नियोजन केले काय आणि मी केले काय?, दोन्हीचा अर्थ एकच! मुलांचा कार्यक्रम आहे म्हणजे माझी जबाबदारी आहे.” त्यांच्या या संवेदनशील व कर्तव्यभावी कृतीमुळे विद्यार्थ्यांसह सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमातील हा क्षण सकारात्मकतेचा आणि मानवी मूल्यांचा सुंदर आदर्श ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बी. डी. शिरसाठ यांनी केले. पंचायत समिती शिक्षण विभाग व पी.आर. हायस्कूलच्या टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.















