धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील धरणी नाल्यात १ नोव्हेंबर रोजी रेशन कार्डांचा भला मोठा गठ्ठा सापडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. ‘त्या’ रेशन कार्डांचा ११ दिवस उलटल्यानंतरही पंचनामा न झाल्याबाबत तहसीलदरांना विचारून सांगतो, असे सांगून जिल्हा पुरवठा अधिकारी दोन दिवसापासून उत्तर देणे टाळत आहेत. याबाबत आता थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करतो, असे आश्वासन दिले आहे.
रेशन कार्डांचा गठ्ठा सापडून ११ दिवस उलटूनही कोणतीच कारवाई होत नसल्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आपण सुटीवर आहोत. मी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करतो. तसेच आपल्याकडे याबाबत असलेली माहिती तथा बातम्या मला व्हाटसअपवर पाठवा मी लागलीच माहिती घेतो, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता या प्रकरणात स्वत: जिल्हाधिकारी लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रकरण दाबण्यासाठी बनावट जबाब घेण्याचा प्रयत्न : संजय महाजन यांचा आरोप
दुसरीकडे प्रकरण दाबण्यासाठी एका तरुणावार दबाव आणून कोऱ्या कागदावर सह्या घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी केला आहे. सध्या आपण प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष ठेवून आहोत. दोषींवर कारवाई न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तसेच योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टींचा भांडाफोड करू असेही अॅड. महाजन यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर दहा दिवस उलटूनही कारवाई होत नसल्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दाट संशय येत आहे.
काय होतं नेमकं प्रकरण?
१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साधारण ५० ते ६० रेशन कार्डांचा एक गठ्ठा धरणी नाल्यात वाहून आला. रेशन कार्डचा एवढ्या मोठ्या प्रमाणात गठ्ठा बघून नागरिकांमध्ये एकच चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर काही सुज्ञ नागरिकांनी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांना फोन लावून याबाबत सूचना केली. त्यानंतर श्री .महाजन यांनी धरणी परिसरात लागलीच भेट देत तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना फोन लावत रेशन कार्डचा गठ्ठा सापडल्या बाबतच्या घटनेची माहिती देत चांगलेच खडेबोल सुनावले होते. जर अशा पद्धतीने धान्यमालासह रेशन कार्डांचा काळाबाजार होत असेल तर याबाबत कडक कारवाई करावी, अन्यथा भाजप तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला होता.
रेशन कार्डचा ‘तो’ गठ्ठा जप्त देखील केलेला नाही
धरणगावात मोठ्या प्रमाणात रेशन कार्डचा गठ्ठा सापडल्यानंतर लागलीच घटनास्थळी पंचनामा होणे, गरजेचे होते. तसेच रीतसर पोलिसात तक्रार देखील देणे गरजेचे होते. परंतू घटनेला ११ दिवस उलटूनही याबाबत कोणतीही प्रशासकीय कारवाई न झाल्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. धक्कादायक म्हणजे महसूल विभागाने अद्यापपर्यंत रेशन कार्डचा तो गठ्ठा जप्त देखील केलेला नाहीय. याबाबत भाजपचे शहरध्यक्ष दिलीप महाजन यांनी सांगितले की, आमच्याकडे अद्यापही ते रेशन कार्डांच्या संदर्भात कुणीही तपास करायला आलेले नाही. परंतू मी आणि माझे सहकारी कन्हैय्या रायपुरकर असे दोघं जण या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करत असल्याचेही दिलीप महाजन यांनी सांगितले.