धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावकरांना मागील काही दिवसापासून ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा भोगावी लागत आहे. शहरात मागील काही दिवसापासून चक्क गटारीसारखे काळे पाणी नळातून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे पालिका प्रशासानाकडून याबाबत उत्तर देण्यासाठी कुणीही समोर आलेले नाहीय.
शहरात काही दिवसांपासून पिवळसर रंगाचा दुषित पाणी पुरवठा होत होता. पाण्यातून दुर्गंधी देखील येत होती. परंतू आता चक्क गटारीसारखे काळ्या रंगाचे पाणी नळातून येत असल्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहे. कालपासून गावातील खत्री गल्ली, लहान माळी वाडा, मुख्य बाजारपेठ या परिसरात काळ्या रंगाच्या दुषित पाणी पुरवठा सुरु झाल्यामुळे सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या मनात मोठी चिंता निर्माण झाली आहे.
सोशल मीडियात व्हिडीओ टाकून पालिका प्रशासनावर नागरिकांची टीकेची झोड !
कालपासून चक्क गटारीसारखे काळे पाणी नळातून येत असल्यामुळे अनेक जण आपापल्या भागात येणारे गढूळ पाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियात टाकून संताप व्यक्त करत आहेत. काही जणांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत पालिका प्रशासनातील कोणताही जबाबदार अधिकारी, कर्मचारीने समोर येऊन काळ्या पाण्याचे कारण सांगितले नाही. नेमकी अडचण काय आहे?, दुषित पाणी पुरवठा का होतोय?, याचे कारण कुणीही समोर येऊन सांगत नाहीय.
मागील आठ दिवसापासून होत असलेला दुर्गंधीयुक्त पाणी काळेकुट्ट पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. यामुळे जनतेच्या मनात तीव्र असंतोष असून तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा सुरु न झाल्यास पालिकेवर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल.
-अॅड. संजय महाजन (जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी सेल)