धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुका क्रिडा संकुलाचे फार थाटात भूमिपूजन करण्यात आले होते. परंतू मागील सात वर्षापासून हे क्रीडा संकुल धुळखात पडून असल्यामुळे क्रीडा प्रेमींकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
धरणगाव तालुका क्रीडा संकुलला एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. तालुक्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय पातळीवर कामगिरी बजावली आहे. परंतू तरी देखील तालुका क्रिडा संकुल अवस्था वाईट बघायला मिळत आहे. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करूनही त्याचा उपयोग होताना दिसून येत नाहीय. धरणगाव-चोपडा रस्त्यावर हे क्रीडा संकुलन दहा ते बारा एकर जागेत विस्तारलेले आहे. मात्र त्याठिकाणी आजच्या घडीला गुरंढोरांचा वावर दिसून येतो. याठिकाणी शासनाने ९५ लाख रुपये खर्च केले आहेत. तर बांधकाम विभागाकडे पाच लाख रुपये शिल्लक आहेत. एक कोटी रुपयांचे हे काम होते. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे क्रीडा संकुल वापर होत नसल्याने प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. क्रीडा संकुलच्या ठिकाणी बांधकाम केलेले असून हॉल, दरवाजे, खिडक्या नाही अशी अवस्था आहे. धक्कादायक म्हणजे क्रीडा संकुलचा वापर गाई म्हशींचा गोठा म्हणून होत आहे. तर काही ठिकाणी आंबट शौकिन फार मोठ्या प्रमाणावर सायंकाळी गर्दी करताना दिसून येतात. कुस्ती, हँडबॉल, खो-खो, हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल यासारखे खेळ याठिकाणी खेळले जाऊ शकतात. तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुलात घेता येऊ शकतात. त्यामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी लक्ष देण्याची गरज असून लवकरात लवकर हे क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे. कुस्तीसह हॉलीबॉल, फुटबॉल,डॉजबॉल अशा अनेक प्रकारच्या खेळांमध्ये धरणगाव तालुक्याचे नाव राज्य स्तरावर घेतले जात असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर किरकोळ कामे पूर्ण करावी, अशी मागणी तालुक्यातील क्रीडा प्रेमींकडून केली जात आहे.