धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नारणे आणि बांभोरी प्र.चा. शिवारात वाळू माफियांनी वाळूचे साठे जमा करून ठेवले होते. धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी अशा पद्धतीचे तब्बल १०० ब्रासचे वाळू साठे साधारण आठवडाभरापूर्वी जप्त केले होते. त्यानंतर आज शासन निर्देशाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामासाठी वर्ग केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वत्र वाळू उपसा बंद आहे. मात्र, बांभोरी प्र.चा. शिवारात रात्रीत वाळू उपसा व्हायचा. उपसा केलेली वाळू नंतर साठा करून ठेवला जायचा. याची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सर्व वाळू जप्त केली होती. त्यानंतर मौजे नारणे येथील १२५ ब्रास, बांभोरी प्र.चा. येथील २५४ ब्रास असा एकूण ३७९ ब्रास जप्त अवैध वाळु साठयाबाबत सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सादर करण्यात आलेला होता. दुसरीकडे अॅग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड डेव्हलपर्स प्रा.लि. पोखरीतांडा, पाळधी ता. धरणगाव यांनी फागणे ते तरसोद या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामासाठी १०० ब्रास वाळूची मागणी असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयास कळविले होते. त्यानुसार मौजे बांभोरी प्र.चा. येथील १) गट नं. ६ मधील व्यायाम शाळेच्या परिसरातील २० ब्रास २) गट नं. ६ मधील मुलचंद पंडीत नन्नवरे यांच्या विटपजावा शेजारील चार ठिकाणची ६५ ब्रास ३) गट नं. ६ मधील रामचंद्र शंकर नन्नवरे यांचे विटपजावा शेजारील १५ ब्रास अशी एकूण १०० ब्रास वाळू साठा उचल करणेकामी परवानगी देण्यात आली होती. यासाठी अॅग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड डेव्हलपर्स प्रा. लि. पोखरीतांडा, पाळधी ता. धरणगाव यांनी १०० ब्रास वाळूसाठ्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठ १० टक्के रक्कम रुपये ४०७६०/- मुद्रांक शुल्क १ टक्के नुसार रक्कम रू. ४०७६/- व अपसेट प्राईजनुसार रक्कम रू. ४०७६००/- तसेच भुपृष्ठ भाडे भरणा १०,०००/- प्रमाणे एकूण रॉयल्टी व इतर कर रू. ४६२४३६/- चलनाने भरणा केला. तसेच तसेच टीसीएस रू. ८१५२/- धनादेशद्वारे भरला होता.
त्या अनुषंगाने प्रांतधिकारी विनय गोसावी यांच्या आदेशाने तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी १०० ब्रास अवैध वाळुसाठयाची वाहतुकीबाबत अॅग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड डेव्हलपर्स यांना फागणे ते तरसोद या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामासाठी दि. २०/०९/२०२१ ते दि. २२/०९/२०२१ या कालावधीत वाळूसाठयाची वाहतूक करण्यासाठी ३ दिवसांची मूदतीची खालील नमुद अटी व शर्तीच्या अधिन राहून दिली आहे. त्यानुसार महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाळू साठा संबंधित कंपनीकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, या वृत्ताला धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दुजोरा दिला आहे.