धरणगाव (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन संस्थेचे कार्य कसे चालते या विषयीची पुरेशी माहिती मिळावी,अवकाश स्थानक,कृत्रिम उपग्रह, सॅटेलाईट व्हेहिकल्स जीएस एलल्व्ही,पीएसएलव्ही माहिती शाळेतच मिळावी या उद्देशाने पी.आर.हायस्कूलमध्ये आज रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन च्या मदतीने जवळपास शंभरच्या वर पोस्टर्स चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे सचिव डॉ.मिलींद डहाळे यांनी केले, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक अजय पगारिया,शाळेचे मुख्याध्यापक डॉ संजीव कुमार सोनवणे, पर्यवेक्षक के.आर.वाघ हे उपस्थित होते.
धरणगाव तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे समन्वयक बी आर महाजन, सहसमन्वयक नवनीत सपकाळे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही अनमोल संधी देशातील नामांकि रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन,चे अध्यक्ष डॉ चंद्रमौली जोशी ,नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्टचे नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील, एपीजे अब्दुल कलाम यंग सायंटिस्ट चे व्हॉइस चेअरमन सुनील वानखेडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली.
पोस्टर्सच्या माध्यमातून विविध साठ सॅटेलाइट व्हेईकल्स व पंधरापेक्षा जास्त वैज्ञानिकांची माहिती देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी अवकाश स्थानक म्हणजे काय ? अवकाश स्थानकामध्ये उपग्रह सोडल्याने होणारे फायदे ,उपग्रह सोडण्यासाठी तयार करण्यात येणारे सॅटॅलाइट व्हेईकल्स ,हबल टेलीस्कोप,स्पेस कॅप्सूल, स्पेस सूट कसा कार्य करतो, त्यामधील उपलब्ध सुविधा,विविध खगोलीय दुर्बिणी, अंतराळ संशोधनातील सर्वोच्च अशा नासा, इसरो, स्पेसेक्स इ. संस्थांची इत्यंभूत माहिती नवनीत सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने प्रत्येक चार्ट चे सखोल निरीक्षण केले व महत्वाच्या नोंदी आपल्या वहीत नोंदवून घेऊन इसरो संस्थेस प्रत्यक्ष भेट देण्याचा मानस व्यक्त केला. या पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनीत सपकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन यु.एस.बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीसाठी विद्यार्थी, सर्व विज्ञान शिक्षक बंधू व शिक्षकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले.