मुंबई (वृत्तसंस्था) मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या शिंदे गटातील काही आमदार चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर धावून गेल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. यासंबंधीचे वृत्त ठाकरे गटाच्या मुखपत्रानेही दिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने शिवसेनेच्या आमदारांत बाचाबाची झाल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. राऊत म्हणाले की, ८ ते १० आमदार आमच्या संपर्कात आहेत. ज्यांना मंत्रिपदं मिळालेली नाहीत असे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातले आमदार आमच्या संपर्कात आहेत. अजित पवार गटाचा शपथविधी झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसांतच मंगळवारी सायंकाळी शिंदे गटाच्या या 2 आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर दौऱ्यावर होते. मात्र, आमदारांमधील भांडणाचे वृत्त समजताच ते आपला दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईत परतले होते. शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये भांडण कोणत्या मुद्यावरून झाले हे समजले नाही. पण यातील एक नेता हा छत्रपती संभाजीनगरमधील असल्याची चर्चा आहे. तर पुढील मंत्री मंडळाचा विस्तार होईल त्यावेळी शिंदे गटाच्या वाट्याला अवघी दोन मंत्रीपदं येण्याची शक्यता आहे.
यामुळे बरेचजण नाराज झाले असून याच मुद्द्यावरून बैठकीत वादंग झाले. अगदी काही जण एकनाथ शिंदेंवर धावून गेल्याचे, शिवीगाळ केल्याचेही समजते’, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. परंतू मुख्यमंत्री कार्यालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, संजय शिरसाट आणि मंत्री संदीपान भूमरे यांनी देखील कालच्या बैठकीत आमदारांमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.