मुक्ताईनगर (प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मराठा समाजाविषयीच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपची पडताळणी करुन बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील व किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे त्याबाबत पत्रकारांना माहिती दिली.
आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था बिघडली आहे. दररोज खून होताहेत. सर्वत्र अवैध व्यवसाय सुरु आहेत. अशा स्थितीत बकाले यांचा नवीन प्रकार समोर आला. एका समाजाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्याशी बोलताना असे वक्तव्य करीत असेल तर त्याचा तीव्र स्वरुपात निषेध नोंदवला पाहिजेत. बकाले सारख्या व्यक्तीला एलसीबीच्या पोलिस निरीक्षकपदी कसे नियुक्त करण्यात आले. कुणाच्या शिफारशीने नियुक्ती झाली, हे पाहणेही गरजेचे आहे. एलसीबीच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यासाठी आयजींनी पात्रतेचे निकष ठरवून दिलेले आहेत. त्यांची नियुक्ती करताना ते निकष का सांभाळले गेले नाहीत. पोलिस अधिकारी एलसीबीच्या निरीक्षकपदी कसा नियुक्त झाला, या संदर्भात शंका असल्याचेही आ. पाटील म्हणाले.