भंडारा (वृत्तसंस्था) रोज होणारे भांडण इतकं विकोपाला गेला की पती- पत्नीने स्वतः वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात दोघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं तीन वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे. परिसरात या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भंडारा शहराला लागून असलेल्या कारधा गावात ही घटना घडली आहे. या गावातील पती आणि पत्नीचं शुल्लक कारणावरुन भांडण झालं. हा वाद इतका विकोपाला गेला की, पती महेंद्र सिंगाडे यांनी स्वतःवर आणि पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. मृतकांमध्ये महेंद्र सिंगाडे वय ३८ वर्ष, मेघा सिंगाडे वय ३० वर्ष, यांचा समावेश आहे. पती महेंद्र आणि पत्नी मेघा यांचं शुल्लक कारणावरुन भांडण झालं होतं. घरात तीन वर्षांचा चिमुकला असताना त्याच्या समोरच दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. यानंतर दोघांनीही एकमेकांवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं.
सुदैवाने या घटनेत तीन वर्षांचा मुलगा बचावला आहे. या घटनेनंतर याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आणि त्यांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.