धरणगाव (प्रतिनिधी) साळवे महसूल मंडळातील शेतकऱ्यांना व युवकांना महसूल पंधरवाडा निमित्त जनसंवाद यात्रेत विविध विषयांवर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. साळवे इंग्रजी विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. पंधरवाड्यानिमित्त शेतकन्यांना अधिकाधिक सोयीसुविधा देत नागरिकांची कामे सुलभ होण्यासाठी उपाययोजना करण्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील राहतील, असे प्रतिपादन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले.
शेतकऱ्यांना व युवकांना मोलाचे मार्गदर्शन करताना विविध योजनांविषयी सखोल माहिती देऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी यावेळी नायब तहसीलदार संदीप मोरे, ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे, खजिनदार डॉ. चंद्रकांत नारखेडे, मुख्याध्यापक एस.डी. मोरे, साळवे सरपंच आशा कोल्हे उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, शेतकरी आत्महत्या अनुदान, भोगवटा वर्ग-२, पी एम किसान व नैसर्गिक आपत्ती, ई के वाय सी, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना यांच्यातील त्रुटी, लाडकी बहीण योजना अनुदान नोंदणी व विद्यार्थ्यांना विविध दाखले, अशा विविध योजनांची परिपूर्ण माहिती दिली. तसेच शेत रस्त्याच्या समस्यांबाबत आपापसात वाद न घालता ते सामंजस्याने सोडवावेत, असे आवाहन केले.
तहसीलदार सूर्यवंशी यांनी केलेल्या मार्गदर्शनाने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच असे उपक्रम राबवल्यामुळे नागरिकांच्या समस्या मार्गी लागून कामे सुलभ होतील. अशी भावना शेतकऱ्यांनी व युवकांनी व्यक्त केली. या प्रसंगी साकरेया शेतकरी सुपुत्र स्वप्नील पाटील यांचा पहिल्या प्रयत्नात पीएसआय झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शेतकरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.