नशिराबाद (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत झाल्यावर नगरपरिषदेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासक यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस किंवा मिठाई वाटप करण्यासंदर्भात सकारात्मकता न दाखवल्यामुळे, गावातील शिव सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने तब्बल १०० कर्मचाऱ्यांना मिठाई व फरसाण वाटप करण्यात आले. यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण यांचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आभार मानले.
गेल्या काही महिन्यापासून नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करण्यात आले. यात नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या ९० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना यंदा पहिल्यांदाच नगरपरिषदेच्या वतीने दिवाळी बोनस किंवा मिठाईचे सुद्धा वाटप केले जाणार नसल्याने गावातील शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी गरीब व गरजू अशा सर्व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, याकरिता शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त फरसाण व मिठाईचे वाटप केले. या कार्यक्रमाला जळगावचे तहसीलदार तथा नशिराबाद नगरपरिषदेचे प्रशासक नामदेव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, जनार्दन माळी, डॉ प्रमोद आमोदकर, श्याम कुमावत, बापू शिंदे, बि.टि.चौधरी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिककांची उपस्थिती या कार्यक्रमाप्रसंगी होती. यंदा दिवाळीनिमित्त फरसाण व मिठाईचे वाटप शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे गणेश चव्हाण व सोनाली चव्हाण यांच्या पुढाकारातून करण्यात आल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने गणेश चव्हाण यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रमोद आमोदकर, तर सूत्रसंचालन बी आर खंडारे यांनी केले. यावेळी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहावयास मिळाला.