जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेसाठी होणाऱ्या मतदानापूर्वी जळगाव विकास सोसायटी मतदार संघातील करंज येथील देवकीनंदन विठ्ठल पाटील (वय ४५) या शेतकऱ्याचा गोव्यात हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एकूण ४७ जण गोव्यासाठी रवाना झाले होते.
जळगाव विकास सोसायटी मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी ४७ मतदारांना शनिवारी सहलीला पाठवले होते. करंज विकास सोसायटी मधून देवकीनंदन पाटील यांचे वडील विठ्ठल पाटील यांचा ठराव झाला होता. सहलीसाठी विठ्ठल पाटील यांच्यासोबतच देवकीनंदन पाटील हे देखील रवाना झाले होते. गोव्यात सोमवारी देवकीनंदन विठ्ठल पाटील यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. देवकीनंदन पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे. मंगळवारी सायंकाळी गोव्याहून एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथे तर येथून अॅम्बुलन्सने मृतदेह आणून रात्री उशिरा करंज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.