जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद झाल्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघाचे उमेदवार नाना पाटील हे औरंगाबाद खंडपीठात माजी मंत्री एकनाथराव खडसे व निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांच्या विरोधात फौजदारी रिट याचिका दाखल करणार आहे. अशी माहिती नाना पाटील यांचे वकील अॅड. धनंजय ढोके यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अर्जाच्या छाननीदरम्यान भाजपच्या स्मिता वाघ, माधुरी अत्तरदे, भारती चौधरी, नाना पाटील यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले होते. या प्रकरणी अत्तरदे व वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कामकाजाबाबत तीव्र आक्षेप घेतले होते. पण नाना पाटील यांना एक संस्थेचे सदस्य असल्याचे सांगत, त्यांच्याकडे कर्जाची थकित रक्कम असल्याचा दाखला सादर करून, त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला होता. मात्र, संबंधित संस्थेचे आपण सभासद नसल्याचे नाना पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे सभासद नसताना त्यांच्याकडून कर्ज घेण्याचा कोणताही संबंध येत नाही. हे खोटे कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा आरोप करीत त्यांनी आता या प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे व निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. शुक्रवारी ही याचिका दाखल होवू शकली नाही. मात्र, सोमवारी ही याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती ॲड. धनंजय ढोके यांनी दिली.
दरम्यान, स्मिता वाघ यांनी देखील शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे आपल्या उमेदवारी अर्ज बाद झाल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. यावर आता सोमवारी कामकाज होणार आहे.