जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या चेअरमन चेअरमनपदासाठी निवड प्रक्रिया ३ रोजी होणार आहे. त्यानुसार चेअरमन पदाचे नाव निश्चित करण्यासाठी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मविआच्या नेत्यांची बैठक होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाने अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना दिले आहेत. तर शिवसेनेलाही आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरवावा लागणार आहे.
आजच्या बैठकीत जिल्हा बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठीच्या संचालकाचे नाव ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी एकनाथराव खडसे तिन्ही पक्षाच्या एकत्रित बैठकीत उमेदवाराचे नाव जाहीर करतील. शिवसेनेलाही त्यापूर्वी आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरवावा लागणार आहे. तीन डिसेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह खडसे यांनी नुकतीच अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पवार यांनी पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार खडसे यांना देत असल्याचे जाहीर केले.
तीनही पक्षांकडे २०-२० महिने अध्यक्षपद असेल असे जाहीर करणाऱ्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना मात्र दुसऱ्या अडीच वर्षांसाठी उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागेल, अशी चर्चा आहेत. या अनुषंगाने खडसे म्हणाले की, अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा फॉर्म्युला आता नव्याने ठरवावा लागणार आहे. जो ठरला होता तो चारही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार होते त्यावेळी ठरला होता. आता नवे निर्णय नव्याने होतील. जिल्हा बँकेत २१ पैकी २० संचालक महाविकास आघाडीचे आहेत. त्यामुळे चेअरमनपदाचा फारसा तिढा नसून राष्ट्रवादीतील काही नावांवर चर्चा सुरु आहे.