जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संचालकांच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. थोड्याच वेळापूर्वी याबाबत अधिकृत घोषणा झाली.
जिल्हा दूध निवडणूक झाल्यानंतर संघाची चेअरमनपदाची निवड १८ रोजी होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर शनिवारी नूतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. रात्री ११ वाजेपर्यंत ही बैठक चालली. याच बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
मुक्ताईनगर मतदार संघातून मंदाकिनी खडसे यांना त्यांच्याच मतदार संघातून आव्हान देत विजय मिळविलेल्या मंगेश चव्हाण यांचीच चेअरमनपदी निवड होणार असे संकेत होते. त्यानुसार चव्हाण यांच्याच नावावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, ‘द क्लिअर न्यूज’ने याबाबत दोन दिवसापूर्वीच आ. मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रकशित केले होते. दूध संघात भाजप- शिंदे गटाला स्पष्ट बहुमत असल्याने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील हे तीन नेते अंतिम निर्णय घेतला असून असून, १७ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीतही आ. मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, दुध संघातील गैरव्यवहाराबाबत आमदार मंगेश चव्हाण यांचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर गोष्टी आमदार चव्हाण हे चांगल्याप्रकारे हाताळतील, असा सर्वांना विश्वास आहे. त्यामुळे मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वांचे एकमत झाल्याचे बोलले जात आहे. प्रशासक पदाच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्याच्या समोर आणला. तसेच दुध संघातील तूप, बटर अपहार बाबत फिर्याद दाखल करण्यापासून सर्व गोष्टींवर मंगेश चव्हाण यांनी जोमाने बाजू लावून धरत अक्षरशः रान पेटविले होते. याच गोष्टीमुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ पडली आहे.