मुंबई (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच कुणाकडे किती आमदार आणि खासदार आहेत यावर पक्षाचा निकाल देऊ नये. तर पक्षाची घटना आणि जनमानसातील पक्षाचं स्थान यावर पक्ष कुणाचा याचा निर्णय द्यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.
पक्ष जर का बाहेर गेलेल्या लोकांमुळे संपणार असेल किंवा पैशांच्या जोरावर फोडणार असेल तर मग लोकशाहीला काय अर्थ राहतो. निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल जाहीर केला तो जर त्यांच्या बाजूने असेल आणि कोर्टाने जर त्यांना अपात्र ठरवलं तर काय करणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे भाष्य केलं आहे. निवडून आलेले आमदार, खासदार म्हणजे पक्ष असं ठरवलं तर ते हस्यास्पद ठरेल. तसंच करायचं असेल तर मग निवडणूक आयोगाने इतका वेळ थांबण्याची गरज नाही. उद्या कोणी पैसेवाला किंवा उद्योगपती उठेल आणि निवडणूक न लढवता, पक्ष न स्थापन करता खासदार विकत घेईल आणि पंतप्रधान होईल. असं करणं म्हणजे लोकशाही नाही.
गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणा आहे. मी दुसऱ्या शिवसेनेला मानतच नाही. राज्यात शिवसेना एकच आहे. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्षाचे भवितव्य ठरत असेल तर उद्या कुणीही पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना खरेदी करू शकतो. थेट पक्षावर दावा ठोकू शकतो. यामुळे लोकशाहीचा बाजार होऊ शकतो. निवडणूक आयोगाने असा बाजार होण्यापासून लोकशाहीला वाचवणे गरजेचे आहे.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे !
1) शिवसेना एकच आहे एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
2) लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.
3) अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठावलं होतं, त्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.
4) शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींची पूर्तता केल्याचे ठाकरे म्हणाले.
5) लोकशाहीचं रक्षण करावं अशी निवडणूक आयोगाला विनंती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण पक्षांतर्गत घटनेचं पालन आम्ही पूर्ण केलं असल्याचे ते म्हणाले. शिंदे गटाला घटनाच नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
6) सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने काय करावं? हे आम्ही सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले.
7) शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या शिंदे गटानं शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांनी शिवसेनेची घटना आम्हाला मान्य नाही असे सांगितले आहे. विभागप्रमुख हे पद शहरापुरते मर्यादीत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
8) अपात्रतेचा निर्णय आधी होणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
9) सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवण्याचं काम केलं जात आहे. हे आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
10) निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व बाबींची पूर्तता आम्ही केली आहे. तरीही आमच्या शपथपत्रावर आक्षेप घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.