नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. भारतातही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यातच आता ओमायक्रॉनपासून बाधित झालेल्या रुग्णांना रात्रीच्या वेळी घाम येण्याची समस्या जाणवू शकते, असा इशारा दक्षिण आफ्रिकेमधील आरोग्य विभागाच्या जनरल प्रॅक्टिशनर डॉ. उनबेन पिल्ले यांनी दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा दावा आहे की, कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट आधी संसर्ग झालेल्या लोकांनाही सहजपणे बाधित करतो. त्याशिवाय लसीचे दोन डोस घेतलेले लोकसुद्दा ओमायक्रॉनपासून सुरक्षित नाही आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट नेमका किती धोकादायक आहे, हे स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञ ओमायक्रॉन व्हेरिएंटची वेगवेगळी लक्षणे दिसल्याचा दावा करत आहेत.
दक्षिण आफ्रिकेमधील आरोग्य विभागाच्या जनरल प्रॅक्टिशनर डॉ. उनबेन पिल्ले यांनी सांगितले की, ओमायक्रॉनपासून बाधित झालेल्या रुग्णांना रात्रीच्या वेळी घाम येण्याची समस्या जाणवू शकते. अनेकदा रुग्णाला एवढा जास्त घाम येतो की, त्यामुळे त्याचे कपडे किंवा अंथरुणही ओले होऊ शकते. बाधिताला थंड जागेवर राहिल्यावरही घाम येऊ शकतो. त्याशिवाय रुग्णाच्या शरीरामध्ये वेदनांची तक्रारही जाणवू शकते. याशिवाय कोरडा खोकला आणि शरीरामध्ये वेदना, घशामध्ये खवखवीऐवजी ओरखडे पडणे, सौम्य ताप, थकवा अशी लक्षणेही दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित कोविड-१९ ची चाचणी करून घ्या.