पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा होती, असा थेट आरोप केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. त्यात ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण मी सांगतो की स्वतः सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचं. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हतं अन् मनीही नव्हतं. मीच म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, अशी माहिती शरद पवार यांनी माध्यमांनी दिली.
वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर त्यांनी दाखवावं. ते मुख्यमंत्री होते, पण त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो. मात्र, त्या पदाला फडणवीस धक्का पोहचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्राचा बंगालशी एक घरोबा आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. यासाठी शरद पवारांनी बंगाली बोलून दाखवलं हे ऋणानुबंध जुने आहेत. ते आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
“तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपाला नाकारलं. तर नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा बाजूला सारुन सांगावं की त्यांना मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा होती आणि ती पूर्ण केली. दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. सुभाष देसाई, दिवाकर रावते होते. मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा नव्हती तर नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावं लागलं? मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.