जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली गावानजीक गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे उभा रिकामा कंटेनर पलटी झाल्याने कंटेरनच्या आडोश्याला उभे असलेल्या दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी आहे. या दुर्घटनेत भोला श्रीकुसूम पटेल (रा. सानीकावा जि. सिवान बिहार) आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२ रा. चाळीसगाव ह.मु. पुणे) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नावे आहे. तर या घटनेत अफरोज आलम (वय-२३ रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार) हा जखमी झालाय.
चिंचोली गावानजीक नवीन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी बिहारमधील काही मजूर आले आहेत. गुरुवारी दुपारी वादळी वारा वाहू लागल्याने वादळापासून जीव वाचविण्यासाठी मजुरांनी पत्र्याच्या शेडचा आसरा घेतला. वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड उडाल्यानंतर शेडमधील मजूर तेथे उभ्या असलेल्या वाहनाच्या आडोशाला गेले. यादरम्यान, अचानक सुसाट वेगाने वाऱ्याला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे उभा कंटेनर देखील पलटी झाला. त्यामुळे कंटेरनखाली आडोशाला उभे असलेले भोला श्रीकुसूम पटेल आणि इंजिनिअर चंद्रकांत वाभळे हे दोघे दाबले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अफरोज आलम हा जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत भोला हा कंत्राटी पद्धतीने कामाला होता. तो गावातील काही मित्रांसोबत कामासाठी आला होता. तर चंद्रकांत वाभळे हे अभियंता म्हणून न्याती कंपनीत नोकरीला होते. १५ दिवसांपासून ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामासाठी आले होते. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.