अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी वडोदरामध्ये एका सभेदरम्यान त्यांना चक्कर आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. ज्याचा रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मुख्यमंत्री विजय रूपाणी रविवारी वडोदराच्या निजामपुरा भागात निवडणुकीच्या प्रचारासाठी एका रॅलीला संबोधित करत होते. त्या दरम्यान ते मंचावर बेशुद्ध होऊन पडले. त्यांच्या प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर ते स्वतःच चालत मंचावरुन खाली उतरले. मुख्यमंत्र्यांना या नंतर हेलीकॉप्टरने अहमदाबादला नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना येथील यू एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रूपाणी यांच्या आरोग्याबाबत कोणतीही माहिती रात्री देण्यात आली नव्हती. त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. सोमवारी त्यांचा रिपोर्ट आला. ज्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांचा ऑक्सीजन लेवल, ईसीजी आणि सीटी स्कॅन रिपोर्ट सामान्य असल्याचं रुग्णालयाने म्हटलं आहे. थकवा आणि कामाच्या ताणामुळे त्यांना चक्कर आल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन रुपाणी यांची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना विश्राती करण्याचा सल्ला दिला आहे.
गुजरातच्या या शहरांमध्ये होणार आहेत निवडणुका
गुजरातच्या अहमदाबाद, सूरत, राजकोट, वडोदरा, जामनगर आणि भावनगर येथे महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. २१ फेब्रुवारीला येथे मतदान होणार आहे. मतमोजणी २३ फेब्रुवारीला होईल. राज्याच्या ३१ जिल्हा पंचायत, २३१ तहसील पंचायत आणि ८१ नगर पालिकांसाठी २८ फेब्रुवारीला मतदान होईल आणि मतमोजणी २ मार्चला होईल.