हिंगोली (वृत्तसंस्था) वसमतच्या झेंडा चौक भागात सोमवारी पहाटे कौटुंबिक वादातून जावयाने सासूचे दगडावर डोके आपटून खून केल्याची घटना घडली. शेवंताबाई वंजे (७५) असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी आरोपी जावयास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या संदर्भात अधिक असे की, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी बाण येथील बाबासाहेब शिनगारे (४८) याच्यासोबत वसमतच्या कविता यांचा विवाह झाला होता. दोघांना एक पाच वर्षांची मुलगी आहे. मात्र मागील चार वर्षांपासून त्यांच्यात वाद होऊ लागले होते. अगदी बाबासाहेब हा कविताला मारहाण देखील करत होता. त्यामुळे कविता तिच्या मुलीसह वसमत येथे माहेरी राहण्यासाठी आली होती. ८ मे रोजीच्या पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास सासू शेवंताबाई आणि जावई बाबासाहेब यांच्यात पत्नीस नांदण्यास का पाठवत नाही?,तिला कोठे पळवून लावले?,यावरून वाद झाला.
यावेळी जावयाने रागाच्या भरात सासूचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटले व तोंडावर, छातीवर लाथा मारल्या. यामुळे शेवंताबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित जावयास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयताची मुलगी कविता बाबासाहेब शिनगारे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.