नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मल्टीविटामिन गोळ्या किंवा सपलिमेंट औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. मल्टीविटॅमिन्स किंवा सपलिमेंट औषधे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घेणे आवश्यक आहे. अशा औषधांचे सेवन करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, त्याबद्दल जाणून घेऊया.
औषधे घेण्यापूर्वी खबरदारी, मल्टीविटामिन गोळ्या घेताना मद्य, अल्कोहोल टाळा
मल्टीविटामिन गोळ्या किंवा सपलिमेंट औषधे घेण्यापूर्वी पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तुमची पचन प्रणाली योग्यरित्या कार्य करत आहे की नाही? जर पचनसंस्था बिघडली असेल तर अशी औषधं घेण्याचा काही उपयोग होणार नाही. जर तुमच्या पोटात पाचक आम्लाची कमतरता असेल किंवा तुम्ही नीट खाल्ले नाही तर तुमचे शरीर मल्टीविटामिन शोषून घेऊ शकणार नाही. तसेच ही औषधे घेताना मद्य, अल्कोहोल देखील टाळले पाहिजे आणि तणावमुक्त राहिले पाहिजे.
मल्टीविटामिन गोळ्या किंवा सपलिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
बरेचदा असे दिसून आले आहे की, लोक कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय मल्टीविटामिन गोळ्या घेणे सुरू करतात. याचे कारण म्हणजे जाहिरातींचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला असतो. जेव्हा लोकांना शरीरात कोणत्याही प्रकारची कमजोरी जाणवते, तेव्हा लोक लगेच मल्टीविटामिन घेणे सुरू करतात. असं करणं हे हानिकारक असू शकते. म्हणूनच, मल्टीविटामिनशी संबंधित कोणत्याही प्रकारचे सपलिमेंट किंवा गोळ्या घेण्यापूर्वी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जास्त डोस टाळणे महत्वाचे
मल्टीविटामिन गोळ्या घेण्यापूर्वी किती डोस घ्यावेत हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. हे बऱ्याच वेळा पाहिले गेले आहे की लोक शरीराची शक्ती किंवा ऊर्जा वाढवण्यासाठी डोस वाढवतात. पण असे केल्याने तुमच्या शरीराच्या अवयवांना इजा होऊ शकते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून मल्टीविटामिन गोळ्या घेत असाल तर हे नक्कीच लक्षात ठेवा.
वेळेची काळजी घ्या
मल्टीविटामिन घेताना, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ते कोणत्या वेळी घ्यावे, किती घ्यावे आणि किती अंतराने घ्यावे. जर तुम्ही काही मल्टीविटामिन मध्ये जास्त अंतर ठेवून घेतल्या तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. तसेच मल्टीविटामिन गोळ्या रिकाम्या पोटी घ्यायच्या आहेत की, खाल्ल्यानंतर घ्यायच्या आहेत हे पाहणे देखील खूप महत्त्वाचे असते. अन्यथा त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही.
मल्टीविटामिन घेताना आहाराची काळजी घ्या
मल्टीविटामिन घेताना, आपण आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. जर आहार योग्य नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ते शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण करतात, अन्नाला पर्याय असू शकत नाहीत.
इतर औषधांसह घेणे धोकादायक
मल्टीविटामिन नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. परंतु, जर तुम्ही आधीच कोणत्याही रोगासाठी काही औषधं घेत असाल तर त्याबद्दल डॉक्टरांशी बोला. जर तुम्ही हे न करता मल्टीविटामिन घेतले तर ते हानिकारक ठरू शकते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेत असाल तर तुम्ही व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊ नये. त्याचप्रमाणे, जर तुम्ही केमोथेरपी उपचार घेत असाल तर यावेळी व्हिटॅमिन सीचे सेवन तुमच्यासाठी घातक ठरू शकते.