मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात उष्माघातामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून जळगाव जिल्ह्यात तीन, तर नागपूरमध्ये दोन आणि अकोला, अमरावती आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ९२ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे.
राज्यात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढले असून विशेषत: विदर्भ आणि मराठवाडय़ात याचा परिणाम मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. या भागात दिवसाचे कमाल तापमान गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सरासरीपेक्षा अधिक आणि ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. नागपूर विभागात ६२ तर अकोला विभागात १५ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नाशिकमध्ये नऊ जणांना तर लातूरमध्ये एका व्यक्तीला उष्माघातामुळे त्रास होत असल्याने उपचार करावे लागले आहेत.
मध्य महाराष्ट्रातील काही भागात तापमानचा पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसवर गेला आहे. पुणे विभागात पाच जण उष्माघातामुळे आजारी पडले आहेत. रुग्णांचा मृत्यू उष्माघातानेच झाला आहे का, याची पडताळणी करण्यासाठी जिल्हानिहाय समिती असते. या समितीने मंजूर केल्यानंतरच ही नोंद केली जाते. गेल्या काही दिवसांत उष्णतेच्या लाटा वाढल्यामुळे यावर्षी एप्रिलमध्येच उन्हाची तीव्रता जास्त वाढली आहे. परिणामी मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येवरही याचा परिणाम झाला आहे, असे राज्याचे साथसर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.