पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. वेदांत (साई) विनोद धामणगावकर (१४, विकासावर, वानवडी, पुणे) असे मृत मुलाचे नाव आहे.
वेदांत हडपसर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. शाळेला सुटी लागल्यामुळे तो मित्रांसोबत गुरुवारी सकाळी क्रिकेट खेळायला गेला होता. खेळत असताना वेदांतने वडिलांना फोन करून त्याच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी वेदांतला फातिमानगर येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अवघ्या १४ वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने पालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.