मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी शुक्रवारी हजर होणार आहेत. पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे शुक्रवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या (ED) चौकशीला सामोरे जाणार आहेत. गेल्या महिन्यात ३० डिसेंबरला ‘ईडी’कडून एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ईडीची चौकशी लांबणीवर पडली होती. अखेर क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर आज एकनाथ खडसे ‘ईडी’समोर हजर होतील. सकाळी साधारण ११ च्या सुमारास एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात पोहोचतील असे सांगितले जात आहे. पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या या चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. खडसे यांना ईडीने ३० डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. त्यासाठी ते जळगावहून मुंबईत आले होते. पण कोरोना झाल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार खडसे यांनी उपचार व विश्रांती घेतली. विलगीकरणाचा कालावधी आता संपल्याने खडसे शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहून चौकशीला सामोरे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे केलेली पुण्यातील जमीन खरेदी वादग्रस्त ठरली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग, त्याचबरोबर उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डी.एस. झोटिंग यांनी याप्रकरणी चौकशी केली होती. मात्र, या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती.