मुंबई (वृत्तसंस्था) पुण्यातील भोसरीमध्ये भूखंड घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर दीड वर्षानंतर जामीन मंजूर केला आहे. एवढेच नव्हे तर, या प्रकरणी न्यायालयाने ईडीच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत.
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ७ जुलै २०२१ रोजी चौधरी यांना अटक केली होती. २०१६ मध्ये खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना, त्यांच्यावर भोसरी भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. एकनाथराव खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून कवडीमोल भावात आपल्या नातेवाइकांच्या नावाने खरेदी केल्याची तक्रार पुणेस्थित हेमंत गावंडे यांनी २०१६ मध्ये बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली होती.
या तक्रारीनंतर एसीबीने खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी आणि मूळ भूखंड मालक अब्बास उक्कानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर खडसे यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. खडसे यांचं भोसरी भूखंड प्रकरणात महसूल मंत्री पद गेले होते. तसेच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील चौकशी झाली होती. खडसे यांचे जावई गिरीष चौधरी हे तर दीड वर्षापासून जेलमध्ये होते.