मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी मोठा निर्णय घेत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं. त्याशिवाय शिवसेना हे नाव वापरण्यास ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंतरीम मनाई केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली असून पुढील संघर्षास सज्ज असल्याचे सांगितले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो शेअर करत, जिंकून दाखवणारच असा एल्गार केला आहे. चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान दुसरीकडे चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या पोटनिवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
सोमवारी चिन्हांची निवड
निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यामुळं आता दोन्ही गटाला अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाहीये. त्यामुळे या निवडणुकीसाठी आता दोन्ही गटाला सोमवारी मुक्त चिन्हांमधल्या 3 चिन्हांची निवड करून ते निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागणार आहेत.
आदित्य ठाकरेंनी पोस्ट केली अग्निपथ कविता
शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हरिवंशराय बच्चन यांची प्रसिद्ध कविता पोस्ट केली आहे. आदित्य यांच्याकडून अग्निपथ कविता पोस्ट करण्यात आली आहे. उद्धव आणि आदित्य यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट पाहता पिता-पुत्र जोरदार संघर्ष करण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे हे आहेत 10 मुद्दे
1) निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं. 2) दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. 3) शिवसेना हे नाव दोन्ही गटांना घेता येणार नाही. मात्र, शिवसेनेशी संबंधित कोणतही नाव घेता येईल. 4) उद्या (सोमवार)पर्यंत नव्या चिन्हाची निवड करण्यासाठीची मुदत निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला देण्यात आली आहे. 5) निवडणूक आयोगानं घेतलेला आजचा निर्णय हा अंधेरी येथील पोटनिवडणूक आणि त्यापुढेही निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत कायम राहणार आहे. 6) निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेला निर्णय हा अंधेरी पोटनिवडणूक आणि त्यापुढे निवडणूक आयोगाकडून निर्णय येईपर्यंत कायम राहील. 7) शिंदे गट किंवा ठाकरे गट यांच्यापैकी एकाने माघार घेतली तर दुसऱ्या गटाला शिवसेना नाव देण्यात येईल. मात्र, कोणत्याच गटाने माघार न घेतल्यास “शिवसेना”नाव आणि राखीव असलेले “धनुष्यबाण” हे चिन्ह दोन्ही गटांपैकी कोणत्याही गटाला वापरता येणार नाही. 8) दोन्ही गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी तीन तीन पर्याय दिले जाणार आहेत, असं देखील निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. 9) दोन्ही गटांना अंधेरी पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने संमती दिलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून चिन्ह वापरावं लागेल. 10) सद्य परिस्थिती पाहता चिन्ह आणि पक्षाबाबत निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ नाही.