जळगाव (प्रतिनिधी) नूतन मराठा महाविद्यालय मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त डॉ साहेब पडलवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रा राकेश गोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ” आदर्श नागरिक म्हणून माझी जबाबदारी” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत एकुण आठ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून वेगवेगळे मुद्दे मांडत आदर्श नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय असणार या विषयावर त्यांच्या मनोगतातून विचार मंथन या निमित्ताने अनुभवयास मिळाले. एक जागरुक मतदार होऊन, पर्यावरणाचे रक्षण करुन, आई- वडील, देशबांधव आणि गुरुजनांचा मान ठेवून, संविधानाचा आदर करुन किंवा आपल्या दैनंदिन जीवनात लहान सहान गोष्टींतून एक आदर्श नागरिक बनता येईल असे एकंदरीत मुद्दे मांडत स्पर्धकांनी उपस्थितांशी संवाद साधला.
प्रातिनिधिक स्वरूपात परिक्षक म्हणून प्रा पल्लवी शिंपी यांनी स्पर्धकांना प्रभावी वक्तृत्व कसे असावे या संबंधीत विशेष सुचना दिल्या.
डॉ. साहेब पडलवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात शासकीय संपत्तीचे आपली संपत्ती म्हणून जरी जतन आणि संरक्षण केले तरी तुम्ही आदर्श नागरिक होऊ शकतात, तुमचा परिसर, भोवताल स्वच्छ आणि सुंदर कसा राहील याची काळजी घेतली तर तुम्हाला आदर्श नागरिक होण्यास कुणीही रोखू शकत नाही असे सांगून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. परिक्षक म्हणून प्रा.स्वाती कोळी आणि प्रा पल्लवी शिंपी यांनी काम पाहिले तर सुत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन प्रा रत्नाकर कोळी यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.