धरणगाव (प्रतिनिधी) येथील तहसिल कार्यालय शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत व सक्सेस करिअर मार्गदर्शक प्रबोधिनी धरणगाव – जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या समारोहाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांवचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी हे होते. या कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून प्रांताधिकारी विनयजी गोसावी, तहसिलदार नितीनकुमार देवरे, न.पा.चे मुख्याधिकारी जनार्दनजी पवार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड व समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबरावजी वाघ हे उपस्थित होते. या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व एक दिवशीय कार्यशाळेचे प्रास्ताविक सक्सेस करिअर मार्गदर्शक प्रबोधिनी जळगाव चे संचालक गुलाबराव पाटील यांनी केले. सहसंचालक लक्ष्मण पाटील यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला यानंतर विचार मंचावरील सर्व मान्यवरांचा महापुरुषांचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन अतिथी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथील नीट परीक्षेत तालुक्यात प्रथम येणारी विद्यार्थिनी हर्षाली राजू वाडले हिचा एम. बी. बी. एस साठी नंबर लागला म्हणून या विद्यार्थिनीचा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या शुभ हस्ते महामातांचा ग्रंथ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रांताधिकारी विनयजी गोसावी यांनी स्पर्धा परीक्षा स्वरूप व अभ्यासाची परिपूर्ण तयारी यासंदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केले, तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी स्पर्धा परीक्षेतील C-SAT, अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संवाद साधला.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था या संदर्भात मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड यांनी एम.पी.एस.सी परीक्षा पद्धती व विषय निहाय अभ्यासाचे नियोजन या संदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केले. या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन एक दिवसीय कार्यशाळेला धरणगाव शहरातील व ग्रामीण भागातील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा फुले हायस्कूल चे उपशिक्षक पी. डी. पाटील यांनी केले तर आभार लक्ष्मण पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसील चे पदाधिकारी व सर्व कर्मचारी वृंद व सक्सेस करिअर मार्गदर्शन प्रबोधनी जळगाव – धरणगांवच्या संपुर्ण टीम ने परिश्रम घेतले.