पुणे (वृत्तसंस्था) आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेल्या उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. बेपत्ता होण्याला २९ दिवस उलटून गेल्यावरही पाषाणकर नेमके कुठे आहेत? या प्रश्नाचं गूढ अद्याप उलगडलेले नाही. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
२१ ऑक्टोबरपासून ते बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्यांना शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांचा कुठेच शोध लागत नसल्याचं समोर आलं आहे. ८ नोव्हेंबरला पाषाणकर हे कोल्हापूरमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर सीसीटीव्हीत दिसून आले होते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचं एक पथक कोल्हापूरला रवाना झालं. मात्र, पाषाणकर तिथेही कुठेच सापडले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी सहा पथकं तयार केली असून कोकणातही त्यांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.पाषाणकर यांचा मुलगा कपिल याने यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. पाषाणकर यांच्या गायब होण्यात राजकीय व्यक्तीचा हात असल्याचाही आरोप यावेळी त्याने केला. त्यामुळे पोलीस त्यादिशेनेही तपास करत असल्याची माहिती आहे. कपिल याने पोलिसांची भेट घेऊन काही राजकीय व्यक्तींचा नावेही सांगितल्याची माहिती आहे.
गौतम पाषाणकर हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठं नाव आहे. गेल्या २९ दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून गौतम पाषाणकर बेपत्ता झाले होते. पोलीस सध्या जागोजागी पाषाणकर यांचा शोध घेत असून त्यांचे नातेवाईक आणि कार चालकाची चौकशी करत आहेत. पाषाणकर कोणालाही दिल्यास त्यांच्या कुटुंबाला ९८२२४७४७४७ या मोबाईल क्रमांकावर किंवा शिवाजीनगर पोलिस ठाण्याला ०२०-२५५३६२६३ या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.