जळगाव (प्रतिनिधी) गणपती विसर्जन मिरवणुकीत नवीन मंडळांना प्रवेश दिला जाणार नसून ज्या मंडळांना किमान चार वर्षे झाली आहे, अशाच मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली.
बुधवार, दि.२७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला उत्सवात सुरुवात झाली. या उत्सवासह विसर्जन मिरवणूकही निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी पोलीस दलाने नियोजन केले आहे. विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र मंडळांची संख्या अधिक असल्याने व त्यांच्याकडून सादरीकरणही होत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत विसर्जन चालते. त्यात आता पुन्हा नवीन मंडळांची विसर्जन मिरवणुकीत भर पडली तर विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवसापर्यंत सुरु राहिल. त्यामुळे आता ज्या मंडळांचा विसर्जन मिरवणुकीत किमान चार वर्षे सहभाग आहे, अशाच मंडळांना यंदा विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी मिळणार आहे.
वाद घालणाऱ्यांना मिरवणुकीत करणार बंदी
यापूर्वी विसर्जन मिरवणुकीदरम्यान ज्या मंडळांनी पोलीस अथवा इतरांशी वाद घातला आहे, अडथळे निर्माण केले आहे, त्यांना मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही, असे नियोजन पोलिसांकडून सुरू आहे. गणपती मंडळ परिसराची सुरक्षितता व कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडळाजवळ किमान दोन सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवादरम्यान पाच, सात व अकराव्या दिवशी ध्वनीक्षेपकांना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी राहणार आहे. मात्र या दरम्यान डीजेचा वापर न करण्याच्याही सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी संपूर्ण गणेशोत्सव काळात एक पोलिस कर्मचारी व एक होमगार्ड तैनात राहणार आहे. तसेच विसर्जन मार्गाची महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करण्यात येणार असल्याचेही डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यांच्या प्रभारींवर जवाबदारी
गणेशोत्सवात मंडळाच्या ठिकाणाची माहिती घेण्याची जबाबदारी पोलीस ठाण्यांच्या प्रभारींवर सोपविली असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले. यामध्ये आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळांना प्रभारी अधिकारी भेट देऊन तेथे सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, पार्कीगची व्यवस्था आहे की नाही, मंडळांकडे स्वयंसेवक पुरेसे आहे का, मंडळाचे विसर्जनाचे नियोजन काय आहे, त्यासाठी कोणते वाहन वापरणार आहे, गाणे कोणते लावणार याची माहिती घेणार आहेत. यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासह वाहतूक कोंडी, ऐनवेळची धावपळ टाळता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिवसनिहाय विसर्जन
दिवस. मंडळ
तिसरा दिवस ३
पाचवा दिवस १९०
सहावा दिवस. ६
सातवा दिवस ४२७
आठवा दिवस ३२
नववा दिवस १४९
दहावा दिवस ८०
अकरावा दिवस २०५९