मुंबई (वृत्तसंस्था) मोदींनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर कमी पडणार नाही, असे भाषणात सांगितले होते. मात्र महाराष्ट्रात ते कमी का पडताहेत. पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही. मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपमधील राजकीय शुक्राचार्यांनी संकटाच्या प्रसंगात महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळू नये, असे म्हटले. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्व आरोग्य सुविधा पुरवाव्यात. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातही केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे राऊत यांनी म्हटले. एक दिवस उद्योगधंदे बंद राहिले तरी चालतील पण लोकांचा जीव वाचला पाहिजे. आता भाजपशासित राज्यांमध्ये लॉकडाऊन लावावा, यासाठी उच्च न्यायालयांना हस्तक्षेप करावा लागत आहे, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले ही खरी बाब आहे. पण मग न्यायालयाने कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना सांगाव्यात. न्यायमूर्ती वेगाने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करु शकतात का, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. त्यामुळे सध्या न्यायालयांनी सरकारच्या कारभारावर शेरे किंवा ताशेरे ओढू नयेत, असे संजय राऊत यांनी सुचवण्याचा प्रयत्न केला.