जळगाव (प्रतिनिधी) या उष्णतेच्या वातावरणात उष्माघाताचा एकाला फटका बसल्याचे समोर आले आहे. बहिणीकडे आलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात घडली. किशोर ज्योतिराम खलपे असे 37 वर्षीय मृताचे नाव आहे. ते जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील रहिवासी होते.
किशोर यांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मृत किशोर खलपे हे मजुरीचे काम करायचे. त्यांच्या बहीण जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहतात. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून किशोर त्यांच्या बहिणीकडे हरीविठ्ठल नगरात आले होते. गुरुवारी दिवसभर त्यांनी काम केले. यानंतर सायंकाळी सहा वाजता रिक्षा थांब्याजवळ चक्कर येऊन ते कोसळले. यानंतर नातेवाईकांनी लगेचच त्यांना वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला अशी नोंद रामानंद नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.