पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) शिक्षक होणे हा व्यवसाय नसून तो एक प्रामाणिक पेशा आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच त्यांच्यातील समाजभान जागृत करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करायला हवे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होईल. हे करत असताना शिक्षकांनी स्वाभिमानी पिढी निर्माण होण्यासाठी संस्कारांचे बिजारोपणही करायला हवे. असे आवाहन व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले. पाळधी ता. धरणगाव येथील गुलाबरावजी पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते.
आपल्या व्याख्यानात शिक्षकांशी संवाद साधताना प्रा. गणेश शिंदे म्हणाले की, आपण नोकरी करत असताना पैसा तर कमवतोच. परंतु आपले जगणे सुंदर करण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजे. निसर्गाशी जुळवून घेता आला पाहिजे. त्यासाठी झाडे लावण्यासह ते जगवण्याची जबाबदारी सुद्धा आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. शिक्षकाचा सर्वात मोठा दागिना म्हणजे ज्ञान आणि सोबतच नम्रपणा होय. यासोबतच आपल्याला काळासोबत टिकून राहायचे असेल तर बदल स्वीकारावा लागेल. आधुनिक जगाबरोबर वाटचाल करताना परिवर्तन स्वीकारून आपल्यात बदल करायला हवे. शिक्षक हा माणूसपण जागवणारा पेशा असून मुलांचा किंबहुना समाजाचा शिक्षकांवर प्रचंड विश्वास असतो. त्यामुळे प्रामाणिक नागरिक घडवण्यासाठी काम करा. आपल्या कामातून आणि ज्ञानातून आपली हवा झाली पाहिजे. स्वाभिमानी पिढी निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष वृत्ती तयार करा, असे आवाहन देखील त्यांनी शिक्षकांना केले.
प्रत्येक शिक्षक हा आदर्श – पालकमंत्री गुलाबराव पाटील
प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी त्यांना शिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करत आहोत. आम्ही जे बोलतो तशीच कृती करत असतो. आज गुरुजनांच्या आशीर्वादाने समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे. आयुष्यात अनेक वळणे येत असतात. मी आयुष्यात गुलाब गुरुजी सुद्धा झालो असतो. परंतु समाजकारणातून राजकारण करत आज राज्याची सेवा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी शिक्षकांचे मला सातत्याने मार्गदर्शन लाभत आले आहे. फक्त पुरस्कार मिळवणारा हा शिक्षक आदर्श नसतो तर प्रत्येक शिक्षक हा आदर्श असतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक तथा जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी ‘शिक्षक सन्मान सोहळा’ बाबतचे महत्त्व विशद करून गुरुजनाविषयी आदर व्यक्त केला. सूत्रसंचालन प्राध्यापक भूषण पाटील यांनी केले तर नाना पाटील सर यांनी मानले.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, गट शिक्षणाधिकारी सौ.भावना भोसले, सौ. सरला पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शेख खलील, विविध शिक्षक संघटनेचे राधेश्याम पाटील, ग स चे ज्ञानेश्वर सोनवणे, नरेंद्र सपकाळे, मनोज माळी, जे के पाटील, धनराज मनोरे, नाना पाटील, शरद पाटील, श्रीपाद पाटील, सौ शितल सोनार, राजेंद्र डॉ. मिलिंद बागुल डॉ. विजय बागुल, नरेंद्र सपकाळे , कैलास वाघ, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, सचिन पवार, मुकुंदराव नन्नवरे, रवींद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, अरविंद मानकरी, कैलास पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षिका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.