हरयाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान देशाची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हरयाणा निवडणुकीत हे दोघे कोणत्या मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत ? – याचा फैसला पक्षश्रेष्ठी उशिराने करणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वीच विनेशने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी अधिकृतरीत्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस के. वेणुगोपाल, हरयाणा प्रभारी दीपक बाबरिया, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुरजभान व इतर नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष सदस्यत्व घेतले. त्यानंतर विनेश फोगाटने म्हटले की, वाईट काळात आपले होते, हे मला समजले. जेव्हा मला रस्त्यावरून ओढत नेले. तेव्हा भाजप सोडून सर्व विरोधी पक्षांनी माझी साथ दिली.
आता मी नवी राजकीय कारकीर्द सुरू करीत आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे अभिमान वाटत असल्याचे तिने सांगितले. तत्पूर्वी विनेश फोगाटने वैयक्तिक कारण पुढे करीत भारतीय रेल्वेमधील नोकरीचा राजीनामा दिला आहे. देशाची सेवा करण्यासाठी रेल्वेने संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विनेशने आभार मानले आहेत. विनेश फोगाट दादरी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर बजरंग पुनिया हे बादली मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, सी. कोण सर्व त्यांना काँग्रेसश्रेष्ठी एखाद्या जाटबहुल भागातून मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, फोगाट आणि पुनियाने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या १० राजाजी मार्ग या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस मुख्यालयात जाऊन दोघांनीही पक्ष प्रवेश केला. तत्पूर्वी बुधवारी त्यांनी दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर फोगाट आणि पुनिया यांच्यासोबतचे छायाचित्र शेअर केले होते.
















