नाशिक (वृत्तसंस्था) लुटमारीच्या इराद्याने दोघा मद्यपींनी एका सेवानिवृत्त सैनिकाला सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुटुंबीयांसमोर धारधार शस्त्राने भोसकल्याची घटना म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. रविदत्त राजेंद्र चौबे (४७,रा. मेट होस्टेल, निशांत गार्डन, धात्रकफाटा) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. म्हसरूळ पोलिसांनी दोघा संशयित हल्लेखोरांना पाठलाग करून तत्काळ ताब्यात घेतले.
रवी चौबे हे सहकुटुंब सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कारने जात होते. त्यावेळी दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. त्यांनी आरडाओरड करीत वाहतूक अडवली. त्यामुळे चौबे यांनी दोघांची समजूत घालून त्यांना बाजूला होण्यास सांगितले. मात्र, दोघा संशयितांनी गोंधळ घालून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चौबे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता एका संशयिताने चौबे यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार केल्याने चौबे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौबे यांना तत्काळ औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, रवी चौबे हे भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले असून, सध्या ते शहरातील एका शैक्षणिक संस्थेत काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेतील दोन संशयितांसह त्यांचे साथीदार हे म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांना अडवून पैशांची मागणी करत होते, अशी माहिती समोर आली आहे. येथील सुरती फरसाण व जगन्नाथ लॉन्सजवळ संशयितांनी मद्याच्या नशेत अनेक वाहने अडवून काही वाहनांच्या काचाही फोडल्या, तर चालकांकडून खंडणीची मागणी करीत दमदाटी केली. यातील काही पीडित चालक हे संशयितांची गुंडागर्दी सुरू असल्याची कैफियत घेऊन म्हसरूळ पोलीस ठाण्यात गेले होते. याचदरम्यान संशयितांनी चौबे यांच्यावर हल्ला करून हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. चौबे यांचा मृतदेह बघताच पत्नी विशाखा चौबे यांच्यासह त्यांच्या मुलींना जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. डोळ्यासमोर संशयितांनी चौबे यांच्यावर हल्ला केल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.















