नागपूर (वृत्तसंस्था) भंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यांचा बुधवारी (१२ मे) मृत्यू झाला आहे. यापैकी दोन वाघांच्या बछड्यांचा मृत्यू हा दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने साचलेल्या पाण्याच्या डबक्यात बुडून झाला आहे. या घटनेमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.
येथील एका कालव्यानजीक असलेल्या उपसा विहिरीत वाघाच्या दोन बछड्यांचा बुडून मृत्यू झाला, तर उपचार करून जंगलात सोडण्यात आलेला आणखी एक बछडा मृतावस्थेत आढळला. या दोन्ही घटना नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी वनखात्याच्या देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
खापाच्या ज्या जंगलात वाघिणीने या बछड्यांना जन्म दिला, त्या परिसरात गेल्या २५ वर्षांपासून वाघिणीने बछड्यांना जन्म दिल्याची नोंद नाही. त्यामुळे वाघीण गर्भवती असल्याचे आणि त्या वाघिणीच्या जवळ वाघाचा वावर असल्याचे कॅमेरात कैद झाल्यानंतर त्यावर देखरेख ठेवणे आवश्यक होते. बछड्याचे मृत्यू नैसर्गिक असले तरीही घटना अतिशय दुर्दैवी आहे, असे भंडारा येथील मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान यांनी सांगितले.
वन्य प्रेमींमध्ये हळहळ
दरम्यान भंडारा वन विभागामध्ये एकाच दिवशी वाघाचे तीन बछडे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारामुळे वन्यजीव प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.