अमळनेर (प्रतिनिधी) अभाविप अमळनेर शाखेच्या वतीने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. अभाविप कार्यालय येथे भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आ.स्मिताताई वाघ व रा.स्व.संघाचे तालुका संघचालक डॉ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ७५ फुट तिरंगा पदयात्रेची सुरुवात झाली.
ही पदयात्रा महाराणा प्रताप चौक, विजय मारोती मंदिर, बस स्थानक, संत गाडगेबाबा चौक असे मार्गक्रमण करीत तिरंगा चौक येथे समारोप करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या. अभाविप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. समारोपप्रसंगी शहर मंत्री अमोल पाटील यांनी अभाविपची भुमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, अभाविप गेल्या ७४ वर्षांपासून स्वामी विवेकानंद यांच्या मार्गावर चालणारी संघटना असून,राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचा विकासही परिषद यामार्फत करत असते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, अभाविप जिल्हा संयोजक इच्छेश काबरा यावेळी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभाविप गावोगावी जाऊन तरुण-तरुणींमध्ये देशभक्ती जागृत करत आहे. तसेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य वीरांनी या यज्ञात आहुती दिली आहे, अशा अज्ञात स्वातंत्र्यवीरांची माहिती विद्यार्थी परिषद संकलित करत आहे. याच निमित्ताने अभाविपने संपूर्ण देशात तिरंगा पदयात्रांचे आयोजन केले आहे.
या तिरंगा पदयात्रेत संघचालक डॉ.चंद्रकांत पाटील, आ.स्मिताताई वाघ, सिनेट सदस्य दिनेश नाईक, प्रा.विजय मांटे, अभाविप जिल्हा संघटनमंत्री ज्ञानेश्वर उद्देवाल, तालुका संयोजक केशव पाटील, प्रा.स्वर्णदिप राजपूत, दिनेश ठाकरे, संकल्प वैद्य यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सगळ्या नियमांचे पालन करून यात्रा काढण्यात आली होती.